आनंदाने नांदत असलेल्या राज्यावर,
अचानक सैतानांची टोळी आली ।
मंदिरं सारी फोडून टाकली,
अब्रू स्त्रियांची धुळीला लावली ।।
शुक्ल पक्षातील तृतीयेला,
एका बालकाचा जन्म झाला ।
जणू रक्षण कराया ह्या स्वराज्याचं,
शिवनेरीवर भगवंत अवतरला ।।
पुढे थोडा मोठा झाल्यावर,
दादोजींच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले ।
लहानपणातच शिकता शिकता,
हिंदवी स्वराज्याचे धोरण आखले ।।
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीच्या शुभदिनी,
रायरेश्वरावर सभा भरवली ।
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी,
स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली ।।
लगेच मुघलांच्या अत्याचारातून,
पहिल्या गडाला मुक्त केले ।
मोठ्या शौर्याने तोरणा जिंकून,
स्वराज्याचे तोरण बांधले ।।
परकीयांच्या तावडीतून मुक्त होऊन,
पुन्हा फडफडू लागला भगवा ।।
शत्रूच्या सैन्याचा नाश करायला,
मोठ्या युक्तीने आखला गनिमी कावा ।।
मात्र अशीच लढाई लढता,
पुरंदरी मुरारबाजी कोसळला ।
अन मिर्झाराजा जयसिंगासह,
२३ किल्ल्यांचा तह झाला ।।
तहातले गडकिल्ले सोडवण्यासाठी,
नवी फौज उभारण्यात आली ।
मुलाचं लग्न बाजूला ठेवून,
तानाजीने प्राणाची आहुती दिली ।।
स्वराज्यवेडे ते मराठमावळे,
आयुष्य स्वराज्यास समर्पित केले ।
बाजी, तानाजी, बहिर्जी, संताजी,
सर्वांनी स्वराज्यासाठी रक्त वाहिले ।।
धन्य असे ती जिजाऊ माय,
जिच्या पोटी ऐसा पुत्र जन्मला ।
धन्य ती महाराष्ट्राची जनता,
ज्यांना महाराजांचा इतिहास लाभला ।।

Comments
Post a Comment