अवगत झालेल्या कलेच्या माध्यमातून शक्य तितका मराठी भाषेचा विकास करण्यासाठीचे काही प्रयत्न.
आजकाल सर्वच लहान मुलं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असतात. एक जागतिक भाषा म्हणून इंग्रजी येणे फार आवश्यक आहे आणि त्यासाठी इंग्रजी माध्यमातून जर आपल्या पाल्यास शिकविले तर तो पुढे जाऊन आपले कर्तृत्व दाखवू शकतो असा सर्व पालकांचा समज आहे आणि ह्यामध्ये काहीच गैर नाही. पण अशाच वेळी आपली मातृभाषा जोपासणं हे देखील तितकच महत्त्वाचं आहे. आजकाल सर्वजण खूप चांगल्याप्रकारे इंग्रजीमध्ये बोलतात पण अश्याच वेळी आपण ज्या मातीत जन्माला आलो तेथील मातृभाषा तर विसरत नाही आहोत ना हे देखील लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. असाच मराठी भाषेत जन्म झालेला मी. शिक्षण मराठी माध्यम सेमी इंग्रजीमधून झालं. पण जसजसा कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या वातावरणात वाढू लागलो तर आपलीच मराठमोळी मुलं ज्यांना मराठी चित्रपट, मराठी गाणी ऐकायला आवडत नाहीत. मराठी लिहिता वाचता येत नाही. असे बरेच जण माझ्या दृष्टीस पडले. इतकेच नव्हे तर काही जणांना चक्क मराठी बोलायला लाज वाटते असेही काहीजण माझ्या दृष्टीस पडले. हा सर्व प्रकार पाहून खूप वाईट वाटलं. हे असंच जर चालू राहिलं तर मराठी भाषा संपुष्टात येण्यास वेळ नाही लागणार. मी वारंवार शक्य तितकं माझ्या कॉलेजमधील मित्रांना मराठी बोलण्याची सवय लावून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच आपल्याला अवगत झालेल्या कलेच्या माध्यमातून शक्य तितका मराठी भाषेचा विकास करण्यासाठीचे काही प्रयत्न.

Comments
Post a Comment