आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं...
आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं।
कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।।
आयुष्यात कधीच एकमेकांचं पटत नसतं।
पण एकमेकांशिवाय मन मात्र रमत नसतं।।
भांडल्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटतच नसतं।
एकदाचं भांडून झालं की मन प्रसन्न झाल्यासारखं वाटू लागतं।।
चार आण्याची लायकी काढून झाल्यावर त्यांचं मन भरून जातं।
आणि प्रत्त्युत्तरात त्यांचे दुर्गुण काढले नाही तर माझं मन अपूर्ण राहतं।।
मनात एकमेकांबद्दल आदर असूनही समोरासमोर दाखवायचं नसतं।
पण बाहेर मात्र एकमेकांचा आदर्श ठेवून ताठ मानेने जगायचं असतं।।
इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वतःच्या गरजांना सुळावर चढवावं लागतं।
आणि ह्या कर्तव्याची परतफेड करण्यासाठी मलासुद्धा झटावं लागतं।।
एकमेकांसमोर एकमेकांची निंदा करण्यातच आमचं जीवन सारं व्यर्थ जातं।
मध्येच "उद्या जर निंदा करायला चेहरा हा दिसेनासा झाला तर" या विचाराने एकमेकांचं काळीज मात्र धडकत राहतं।।
अरे आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं।
कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।।

Comments
Post a Comment